Published on
:
04 Feb 2025, 11:42 pm
Updated on
:
04 Feb 2025, 11:42 pm
वॉशिंग्टन : पृथ्वीसह अवकाशातील प्रत्येक ग्रहाविषयी मानवाला कुतूहल वाटतं. पण, यातही जीवसृष्टीचं अस्तित्वं असणारा एकमेव ज्ञात ग्रह म्हणून या पृथ्वीचे कायमच कुतूहल पाहायला मिळालं आहे. हीच पृथ्वी 24 तासांत स्वत:भोवतीची एक फेरी, तर 365 दिवसांत सूर्याभोवतीची एक संपूर्ण फेरी पूर्ण करते. बहुतांश क्षेत्र पाण्यानं व्यापलेल्या या ग्रहाची प्रत्यक्षातील द़ृश्य तुम्ही कधी पाहिलीयेत? आता खासगी अवकाश संशोधन संस्था ‘फायरफ्लाय एरोस्पेस’नं अशी द़ृश्यं नुकतीच सर्वांच्या भेटीला आणली आहेत. चंद्राच्या दिशेनं आपल्या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करण्याआधी ब्ल्यू घोस्ट लुनार लँडरने अवकाशातल्या त्या अंधकारमय विश्वात निळ्या रोषणाईमध्ये चकाकणार्या पृथ्वीची छाया टिपली आहे.
15 जानेवारी 2025 रोजी सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत अगदी सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये ‘ब्ल्यू घोस्ट’नं महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या लँडरनं आता पृथ्वीची कक्षा सोडली असून, ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पुढे मार्गस्थ झालं आहे. नासाच्या कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेस (सीएलपीएस) इनिशिएटिव्ह अंतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ब्ल्यू घोस्टच्या लँडरला चंद्राच्या कक्षेसह त्याच्या जिओफिजिकल गुणधर्मांचं परीक्षण करण्यासाठी त्यावर अद्ययावत उपकरणं लावण्यात आली आहेत. या मोहिमेंतर्गत चंद्राच्या पृष्ठावर राहून दोन आठवडे कार्यरत राहत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती निरीक्षणातून समोर येणार आहे. साधारण 60 दिवसांसाठी ब्ल्यू घोस्ट सुरू राहणार असून, त्याची संभाव्य लँडिंग 2 मार्च 2025 रोजी होईल, असं सांगितलं जात आहे.