संगमनेर मतदार संघातील गावोगावी सायकलवरून प्रचार करणार्या नवनाथ पावसे व सागर पावसे यांना कवठे मलकापूर परिसरामध्ये दहा-बारा जणांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. जखमी पावसेंना तातडीने साकुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हिवरगाव पावसा येथील नवनाथ लहानु पावसे व सागर किसन पावसे हे मागील दहा दिवसांपासून संगमनेर तालुक्यात सायकलवर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा प्रचार करत आहेत. साकुर येथे सभा असल्याने त्यांनी दिवसभर पठार भागातील अनेक गावांमधून सायकलवरून आमदार थोरात यांचा प्रचार केला. हा विशेष प्रचार लक्षवेधी ठरला असल्याने महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध राग निर्माण झाला. कवठे मलकापूरचवरून साकुर येथील सभेला येत असताना वाटेमध्ये महायुतीच्या विशेषता शिंदे गटाच्या दहा - बारा जणांनी त्यांना अडवले व तुम्ही प्रचार करू नका, अशी दमदाटी दिली.
यावर नवनाथ व सागर यांनी आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्ही प्रचार करणार असे सांगितल्यानंतर या लोकांनी त्यांना मारहाण केली. काठीने मारहाण केल्यानंतर त्यांच्या पाठीवर वळ उठले तर नवनाथचा हात मोडला. तर सागरला जबर मारहाण झाली. ही माहिती समजतात शंकर पाटील खेमनर व इंद्रजीत खेमनर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन जखमी दोघांनाही साकुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. यानंतर आमदार बाळासाहेब थोरात व डॉ.जयश्री थोरात यांनी या कार्यकर्त्यांना भेट दिली.
राहाता तालुक्यातील दहशत संगमनेर तालुक्यात चालणार नाही. येथे सुसंस्कृत वातावरण आहे. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होते. मात्र कार्यकर्त्यांना एकटे गाठून मारहाण करायची ही संस्कृती खपवून घेणार नाही. पोलिसांनी मारहाण करणार्यांना तातडीने अटक करावी. अन्यथा आम्ही पुरा बंदोबस्त करू.
आमदार बाळासाहेब थोरात, काँग़्रेस नेते