सातपूर, अंबडमध्ये स्क्रॅपमाफियांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. Image Source (Meta AI)
Published on
:
06 Feb 2025, 5:31 am
Updated on
:
06 Feb 2025, 5:31 am
नाशिक : उद्योजकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही सातपूर, अंबडमध्ये स्क्रॅपमाफियांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. स्क्रॅपने भरलेले ट्रक कंपनीच्या प्रवेशद्वारावरच खाली करायला लावणे, ट्रकला कंपनीत प्रवेश करू न देणे, असे प्रकार समोर येऊ लागल्याने उद्योजक धास्तावले आहेत. काही उद्योजकांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे तक्रारी करत स्क्रॅपमाफियांचा बंदाेबस्त करण्याची मागणी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वीच अंबड औद्योगिक वसाहतीत स्क्रॅपमाफियांनी घातलेला उच्छाद समोर आला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उद्योजकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिल्याने स्क्रॅपमाफियांचे धाबे दणाणले होते. दरम्यान, आता पुन्हा स्क्रॅममाफिया सक्रिय झाल्याने उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. कंपनीच्या प्रवेशद्वारावर स्क्रॅपने भरलेले ट्रक खाली करायला लावणे, ट्रकला कंपनीत प्रवेश करू न देणे, स्क्रॅपसाठी कंपनी मालकावर दबाव टाकणे, स्क्रॅपचे दरही परस्पर निश्चित करणे आदी प्रकार या माफियांकडून सर्रास सुरू होते. वास्तविक, नोंदणीकृत स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्यांकडून निविदा प्रक्रियेतून स्क्रॅप उचलण्याचे आदेश मिळवले जातात. हे व्यावसायिक जीएसटीसारखे सर्व करही भरतात. चर्चेतून स्क्रॅपचे दर निश्चित करतात. मात्र, या सर्व प्रक्रियेला फाटा देत स्क्रॅपमाफिया जबरदस्तीने कंपन्यांमधील स्क्रॅप उचलत आहेत. यासाठी कंपनी मालकावर दबावतंत्राचा वापर केला जात आहे.
दरम्यान, स्क्रॅपमाफियाच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी थेट मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह पोलिस आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. विक्रम नागरे, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, पवन पवार यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अगोदरच नाशिकला नवे उद्योग येत नाहीत. अशात स्क्रॅपमाफियांचा वाढता जाच नाशिकच्या औद्योगिक विकासाला हानिकारक असल्याने, स्क्रॅपमाफियांचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
या स्क्रॅप माफियांवर राजकीय वरदहस्त असल्याने, बिंनधिक्कतपणे उद्योजकांवर दहशत निर्माण करण्याचे काम या टोळीकडून केले जात आहे. बरेच स्क्रॅप माफिया राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. मागील काही दिवसांपासून ही टोळी पुन्हा एकदा सक्रीय झाली असून, उद्योजकांना धमकावण्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. उद्योजकांनी याबाबतच्या तक्रारींचे ई-मेल पोलिस आयुक्तांसह मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना पाठविले असून, तत्काळ स्क्रॅप माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
यापूर्वी माजी नगरसेवक सचिन भोर यांनी देखील पोलिस आयुक्तांकडे स्क्रॅप माफियांचा बंदोबस्त करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे केली होती. एका राजकीय पक्ष पुरस्कृत दहशतवाद सातपूर औद्योगिक वसाहतीत सुरू असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कंपनीच्या प्रवेशद्वारावर स्क्रॅप माफियांच्या दहशतीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याबाबतही निवेदनात भोर यांनी स्पष्ट केले होते.
कुठल्याही परिस्थितीत औद्योगिक शांतता भंग होणार नाही, याची सगळ्यांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे. औद्योगिक शांतता ठेवणे सर्वांचीच जबाबदारी आहे.
- प्रदीप पेशकार, माजी अध्यक्ष, भाजप उद्याेग आघाडी
औद्योगिक शांतता असताना असे प्रकार समोर येत असतील तर त्यांचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला खिळ बसू शकते.
- ज्ञानेश्वर गोपाळे, बीओपीपी अध्यक्ष, आयमा