तृणमूल काँग्रेसने ( Trinamool Congress ) पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे ( West Bengal ) नाव बदलण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला आहे. टीएमसीच्या खासदार ममता ठाकूर यांनी राज्यसभेत भाषणादरम्यान राज्याचे नाव बदलण्याची मागणी सरकारला केली आहे. दरम्यान पश्चिम बंगालचे नाव बदलून ते ‘बांग्ला’ करण्याची मागणी संसदेत करण्यात आली आहे. 2018 साली सरकारने विधानसभेत हा ठराव मंजूर केला होता आणि केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवून गृह मंत्रालयाला हे नाव बदलण्याची विनंती केली होती.
पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचा निर्णय तेथील लोकांच्या भावनेशी जोडला गेला आहे. तेथील बंगाली भाषिक लोक राज्याचे प्राचीन नाव बदलून बांगला करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक मोठ्या शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. चेन्नई, बंगळुरू, मुंबई, प्रयागराज अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांची पूर्वीची नावे बदलण्यात आली आहेत, असा उल्लेख प्रस्थावात करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये पहिल्यांदा राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. परंतु तांत्रिक कारणांमुळे तत्कालीन यूपीए सरकारने हा प्रस्ताव नाकारला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी राज्य विधानसभेने पश्चिम बंगालसाठी तीन वेगवेगळ्या नावांची मागणी केली होती. यामध्ये हिंदीमध्ये बंगाल, इंग्रजीमध्ये बंगाल आणि बंगाली भाषेत बांग्ला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सुमारे 7 वर्षांनंतर 2018 साली पुन्हा राज्य विधानसभेत राज्याला फक्त ‘बांग्ला’ हे एकच नाव देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आला होता. परंतु केंद्र सरकारने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचपार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या वतीने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये हे नाव देण्यात आले
1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्याला पश्चिम बंगाल हे नाव मिळाले असे प्रस्तावात म्हटले आहे. त्यावेळी तत्कालीन बंगालचे दोन भाग झाले होते. पूर्वेकडील प्रदेश पाकिस्तानला म्हणजेच सध्याचा बांगलादेश आणि पश्चिमेकडील प्रदेश हिंदुस्थानला देण्यात आला होता. म्हणूनच या राज्याचे नाव पश्चिम बंगाल ठेवण्यात आले आहे. या नावाचा 1947 पूर्वीच्या बंगालच्या इतिहासशी आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही.